top of page
Screenshot 2023-10-04 232819_edited.jpg

प्रस्तावना -  १९४२ चा स्वातंत्र्य लढा हा भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील एक महत्वाचा लढा म्हणून ओळखला जातो. महात्मा गांधींच्या नेतृत्वावर तत्कालीन तरुणांचा पूर्ण विश्वास होता. त्यातीलच पुर्वीच्या सातारा जिल्ह्यातील वाळवा गावचे सुपूत्र म्हणजे पद्मभूषण क्रांतिवीर डॉ.नागनाथअण्णा नायकवडी हे होत. नागनाथअण्णा नायकवडी यांनी ४२ च्या स्वातंत्र्य लढ्यात रोमहर्षक आणि दैदिप्यमान योगदान दिले आहे. त्यांचे हे योगदान इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहून ठेवण्यासारखे आहे. प्रचंड आत्मविश्वास, धाडस आणि टोकाचा त्याग यामुळे अण्णांनी स्वत:ची एक नाममुद्रा स्वातंत्र्य चळवळीत उमटविली आहे. अण्णा ही केवळ एक व्यक्ती नसून तो एक विचार आहे. हा विचार बहुजनांच्या संपूर्ण विकासासाठी अखेरपर्यंत कार्यरत राहीला. महात्मा गांधी यांच्याप्रमाणेच महात्मा फुले, राजर्षि शाहू महाराज आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे अण्णा हे वैचारीक वारसदार होते. स्वातंत्र्यपुर्व व स्वातंत्र्योत्तर काळातील अण्णांच्या योगदानातून महाराष्ट्रात “अण्णा ईझम' सुरु झाला म्हणूनच अण्णा म्हणजे महाराष्ट्राला ललानभूत वाटणारे व्यक्तीमत्व आहे. 

१) अण्णांचा जन्म, बालपण आणि शिक्षण -  आदरणीय नागनाथअण्णा नायकवडी यांचा जन्म १५ जुलै १९२२ रोजी वाळव्यातील एका सामान्य शेतकरी कुटुंबात झाला. त्यांच्या वडिलांचे नांव श्री.रामचंद्र गणू नायकवडी हे होते तर आईचे नांव सौ.लक्ष्मीबाई रामचंद्र नायकवडी असे होते. वडिल रामचंद्र नायकवडी यांना अण्णांनी पैलवान होऊन घरची शेती सांभाळावी असे वाटत होते. तर आई लक्ष्मीबाई या स्वतंत्र विचाराच्या असल्यामुळे आणि त्यांचे वडिल ब्रिटीश सैन्यात कलकत्त्याला सुभेदार म्हणून काम करत असल्यामुळे इंग्रजांचा जुलूम त्यांनी जवळून पाहिला होता. त्या विलक्षण धाडसी आणि कर्तृत्वान होत्या. त्यामुळे आपला मुलाने शिक्षण घेऊन देशासाठी काहीतरी केले पाहिजे असे त्यांना वाटत होते. त्यांच्या प्रेरणेतूनच अण्णांनी शिक्षण घेण्याचे ठरविले. त्यांचे प्राथमिक शिक्षण वाळव्यामध्ये झाले. नागनाथअण्णांनी वयाच्या ८ व्या वर्षी १९३० ची स्वातंत्र्य चळवळ अनुभवली. क्रांतिसिंह नाना पाटील गांधींजीचे विचार सांगण्यासाठी वाळव्यामध्ये सभा घेत असत. त्या सभा वाळव्यातील मारुती मंदिराच्या पटांगणात होत असत. छत्रपती शिवरायांच्या जयजयकारासह हाती तिरंगा घेऊन गावात नाना पाटलांच्या नेतृत्वाखाली फेऱ्या निघत आणि नंतर त्या फेरीचे जाहीर सभेत रुपांतर होई. नाना पाटलांच्या प्रभावी वाणीचा अण्णांच्या बालमनावर परिणाम झाला आणि स्वातंत्र्याची आस त्याच्या मनात निर्माण झाली. वाळवा येथील प्राथमिक शिक्षण संपलेनंतर पुढील शिक्षणासाठी अण्णा आष्ट येथे गेले. तिथे स्वातंत्र्य प्रेमाने प्रेरीत करणारे आणि राष्ट्रीय विचारांचे त्यांचे वर्गशिक्षक हणमंत नवांगुळ यांचे संस्कार त्यांच्यावर झाले. त्यांनी अण्णांना परकीय सत्तेची जाणीव करुन दिली आणि त्यांचेकडून स्वातंत्र्य संग्रामाचे धडे गिरवून घेतले. अण्णा वर्गात एक हुशार विद्यार्थी म्हणून ओळखले जात होते. फायनलची परिक्षा पास झालेवर पुढच्या शिक्षणासाठी अण्णांनी इतिहास प्रसिध्द नगरी कोल्हापूर येथील प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डीगमध्ये प्रवेश घेतला आणि शिक्षणासाठी राजाराम हायस्कूलमध्ये नांव दाखल केले. याच काळात त्यांचा राष्ट्रसेवादलाशी संबंध आला. त्यांनी खादी पोषाख परिधान करुन खादीचा प्रचार व प्रसार कार्यास सुरुवात केली. प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डींगमध्ये गांधीजींचे हरिजन नावाचे साप्ताहिक येत असे त्यातील विचारांनी अण्णा प्रभावीत होत असत. विद्यार्थी दशेतच १९४० मध्ये अण्णांनी कामेरी, ता.वाळवा, जि.सांगली येथे विद्यार्थी परिषदेचे आयोजन केले. मित्रांच्या सहकार्याने व्हॉलंटरी स्वरुपात २० शाळा सुरु केल्या. पुढे कर्मवीर भाऊराव पाटील यांचेशी त्यांचा परिचय झाला आणि अण्णांनी या शाळा रयत शिक्षण संस्थेला जोडल्या.

 

२) इंग्रजी जुलमी सत्तेच्या विरुध्द बंड -  हरिजन साप्ताहिकामध्ये ७ ते ९ ऑगस्ट १९४२ या काळात मुंबई येथे अखिल भारतीय काँग्रेसचे अधिवेशन गवालिया टँकवर भरणार होते आणि या अधिवेशनात महात्मा गांधी स्वातंत्र्या संदर्भात निर्णायक भूमिका मांडणार होते. या सभेत गांधीजी यांच्या समवेत पंडीत नेहरु, सरदार पटेल, मौलाना आझादयांची भाषणे होणार होती, विद्यार्थी कार्यकर्ता म्हणून सदर अधिवेशनामध्ये अण्णा कोणतीही वाहनाची व्यवस्था नसतांना त्या सभेत सहभागी झाले. सभेसाठी आवश्यक तिकीट काढणेसाठी त्यांचेकडे पैसे नसल्यामुळे त्यांनी पुर्वेच्या बाजूला अधिवेशनालगतच आंब्याचे झाड होते त्या झाडांवरुन उडी मारुन अधिवेशनात प्रवेश घेतला. ८ ऑगस्टच्या महात्मा गांधींच्या ऐतिहासिक चले जाव आणि “करेंगे या मरेंगें' या संदेशपर भाषणाचा त्यांच्या मनावर खूप परिणाम झाला. “देश स्वतंत्र झाल्याशिवाय पुढचे शिक्षण घ्यायचे नाही आणि लग्नही करायचे नाही” असा निश्चय करुन ते वाळव्यास परतले.  

३) राष्ट्रीय स्वातंत्र्याच्या अग्निकुंडात बेधडक उडी -  मुंबईतून वाळव्याला परत आल्यानंतर आपला निर्णय आईवडिलांना अण्णांनी सांगितला पण तो वडिलांना पटला नाही. सरतेशेवटी आईवडिलांनी वाळव्यात राहून आंदोलनात भाग घेण्यास परवानगी दिली. अण्णांनी या काळात सभा, परिषदा, आंदोलने, मोर्चे, बैठका यांनी परिसर पिंजून काढला. इस्लामपूर कचेरीवरच्या मोर्चेच्या वेळेला निशस्त्र स्वातंत्र्य सैनिकांच्यावर गोळीबार करुन स्वातंत्र्य लढा चिरडून टाकणाऱ्या इंग्रजांच्या नितीवर उपाय म्हणून सुभाषचंद्र बोस यांच्या आझाद हिंद सेनेप्रमाणेच क्रांतिकारक तरुणांची शिराळा पेठेत प्रति आझाद हिंद सेना स्थापन केली. 

४) टपाल गाडी लुट -  स्वातंत्र्य चळवळीसाठी अण्णांनी कधीही खाजगी संपत्ती लुटली नाही, त्या ऐवजी ते नेहमी सरकारी खजिन्यावर लक्ष ठेवून असायचे. कोल्हापूरहून कोडोलीला मनी ऑर्डरचे पैसे घेऊन एक टपाल गाडी जाणार होती हे अण्णांच्या मित्रांनी त्यांना सांगितले. निवडक सहकाऱ्यांसह नियोजन करुन ती टपाल गाडी अण्णांनी लुटली आणि जोतिबाच्या डोंगराकडे पलायन केले. या लुटीतून विशेष अशी रक्कम मिळाली नाही पण तात्पुरत्या खर्चाची व्यवस्था झाली आणि इंग्रजी सत्तेला पहिला हादरा अण्णांनी दिला. 

५) हत्यार मिळविणेचा निर्धार -  इस्लामपूरच्या मोर्चामध्ये शस्त्रे नसल्यामुळे अण्णांच्या दोन सहकाऱ्यांना हुतात्मा व्हावे लागले होते. त्यामुळे अण्णांना स्वातंत्र्य चळवळीसाठी शस्त्रांची गरज भासत होती आणि त्यामुळे गोव्याहून शस्त्रे आणण्याचा निर्धार केला. कोल्हापूर, गडहिंग्लज करत अण्णांनी ११ नोव्हेंबर १९४२ रोजी गोव्याकडे प्रयाण केले. खिशामध्ये एक दमडीही नसताना शस्त्रे आणल्याशिवाय परत यायचे नाही असे अण्णांनी ठरविले होते आणि बरोबर ४४ व्या दिवशी म्हणजे १५ डिसेंबर १९४२ रोजी हत्यारासह अण्णा परतले. अशी ही गोव्याहून हत्यारे आणण्याची पहिली मोहिम अण्णांच्या भगिरथ प्रयत्नाने यशस्वी झाली. 

६) पे-स्पेशल ट्रेन लुट -  चळवळ दिवसांगनीक वाढतच होती त्यासाठी आर्थिक पाठबळ हवे होते. क्रांतिकारक सरकारी खजिन्याच्या शोधात होते. पे-स्पेशल ट्रेनचा सुगावा अण्णांना एके दिवशी लागला. दर महिन्याच्या ७ तारखेला रेल्वे कर्मचाऱ्यांचा पगार घेऊन मिरजेहून पे -स्पेशल ट्रेन सुटते हे कळताच अण्णांनी ट्रेन लुटण्याचा धाडशी निर्णय घेतला आणि आपल्या सहकाऱ्यांसहीत शेणोली, ता.कराड, जि.सातारा येथे ७ जून १९४३ या दिवशी कोणताही अनुचित प्रकार न होता केवळ २८ मिनिटात ही मोहिम फत्ते केली. पगाराची गाडी लुटल्यामुळे इंग्रजांचे धाबे दणाणले. त्यांच्या शोधासाठी ब्रिटीशांनी फौजफाटा वाढविला. 

७) प्रतिसरकार- क्रांतिवीर नागनाथ अण्णांचे योगदान -  ३ ऑगस्ट १९४३ ला क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पणुंब्रे येथे प्रतिसरकारच्या कामाची घटना आणि रुपरेषा ठरविणेसाठी प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक झाली. प्रतिसरकारचे ४ वेगवेगळया गांवी १८ समूह तयार करणेत आले. वाळवा शिराळा समूहाचे प्रमुख नागनाथअण्णा होते. स्वतंत्र भारत नावाचे पत्रक प्रतिसरकारच्या मार्फत काढले जात असत. ती पत्रके गावोगांवी पोहचविणेसाठी धावपटूंची नेमणूक करुन त्यांचेमार्फत पत्रक पोहोच करणेचे काम वाळवा शिराळयामध्ये राबले. भारतात सर्वत्र चळवळ थंडावत होती पण एकट्या सातारा जिल्ह्यात अण्णांच्या सारख्या भूमिगतांनी ती चळवळ धगधगत ठेवली. या कामात आई लक्ष्मीबाई व वडिल रामचंद्र नायकवडी यांनी मोलाचे सहकार्य केले. त्यासाठी दोघांनाही अनुक्रमे ३ महिने व ६ महिने असा कारावास भोगावा लागला. 

८) सांगाव बंदुका लुट -  स्वातंत्र्य चळवळीसाठी शस्त्रे कमी पडत होती म्हणून अण्णांनी सांगाव, ता.कागल, जि.कोल्हापूर येथील इंग्रजांच्या पोलीस स्टेशनमधील बंदुका लुटण्याचा ऐतिहासिक आणि क्रांतिकारक निर्णय घेतला आणि शुक्रवार दि. १ ऑक्टोंबर १९४३ रोजी दिवे लागणेच्या वेळेस भूमिगत कार्यकर्त्यासह पोलीस चौकीवर धाड टाकून बंदूका हस्तगत केल्या. त्यामुळे इंग्रजी सत्तेला हादरा बसला. 

९) धुळे खजिना लुट -  अण्णांच्या इतिहासातील रोमहर्षक पान म्हणजे धुळे खजिना लुट हे होय. स्वातंत्र्यासाठी हत्यारे मिळतील पण त्यासाठी पैशाची गरज होती. यासाठी अण्णांनी साताऱ्यापासून खूप लांब अशा खानदेशातील धुळे खजिना लुटण्याची धाडशी मोहिम आखली. खजिना कोठे व कसा लुटावा याचे नियोजन आटपाडीच्या चरखा संघात झाले आणि अण्णांनी आपल्या निवडक सहकाऱ्यांसह थेट खानदेश गाठला. तिथल्या स्वातंत्र्य सैनिकांशी संधान बांधून साडेपाच लाख रुपयांचा खजिना चिमठाणा इथे लुटला. त्याचा रोमहर्षक इतिहास जयवंत अहिर यांनी लिहिलेल्या चरित्रात सापडतो. 

१०) सातारा जेल फोडून पसार -  नागनाथअण्णा काही महत्त्वाच्या बैठकीसाठी वाळव्याला आले असल्याची खबर देशद्रोही एस डब्ल्यु. देशपांडे यांनी ब्रिटीश अधिकाऱ्यांना दिली. वाळव्याच्या कोटभागावर रात्रीच्या वेळेला जेवण करुन देसाई यांच्या घरामध्ये अण्णा विश्रांती घेत असतांना इंग्रजांनी धाड टाकून अण्णांना २९ जुलै १९४४ रोजी पकडले आणि इस्लामपूरला व्हाया आश घेऊन तुरुंगात डांबले. त्याच वेळेला अण्णांच्या सहकाऱ्यांनी गद्दार देशपांडे यांचा उजवा हात आणि डावा पाय कलम केला. अण्णांनी मनाशी एक निर्धार केला की आपण लवकरच जेलमधून पसार व्हायचे. जोपर्यंत आपण पलायन करत नाही तोपर्यंत एक भाकरी पूर्ण खायची नाही असे ठरविले. ही बातमी ब्रिटीशांना कळाल्यानंतर अण्णांची रवानगी अभेद्य अशा सातारा जेलमध्ये केली. साताऱ्यात पोहचल्यानंतर केवळ चौथ्या दिवशी मनोरा करुन सहकाऱ्यांच्यासह १० सप्टेंबर १९४४ रोजी १८ फूट उंचीच्या तटावरुन अण्णांनी उडी मारुन स्वत:ची सुटका करुन घेतली. तेथून कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या घरी मुक्काम करुन मेढा, पाटण, तांबवे मार्गे ऐतवड्याच्या कॅम्पवर दाखल झाले. 

११) गिलबर्टच्या हातावर तुरी -  नागनाथअण्णांना पकडण्यासाठी ब्रिटीशांनी क्रूर अशा गिलबर्टची नेमणूक केली. गिलबर्ट साताऱ्याला आल्यापासून अण्णांना शोधत होता पण अण्णा त्यांना सापडत नव्हते. अण्णा त्यांच्या सहकाऱ्यांसह ऐतवडे येथील राजुताई पाटील (बिरनाळे) यांच्या घरी बैठकीनंतर जेवणासाठी बसले होते ही बातमी गिलबर्टला कळाली. अण्णा पाटावर बसणार इतक्यात अण्णांच्यावर झडप घालण्यासाठी गिलबर्ट चपळतेने घरात घुसला. अण्णांची आणि गिलबर्टची नजरानजर झाली. डोळ्याचे पाते लवायच्या आंत विजेच्या वेगाने परसदाराच्या ५ फूट उंचीच्या तटावरुन उडी घेऊन अण्णा पळत सुटले. गिलबर्ट पाठलाग करत होता. पळतांना अगोदरच हेरुन ठेवलेल्या विहिरीच्या धावेवरुन पिंपळाच्या पारब्यांना धरुन अण्णा झरझर खाली आले आणि गुहेत दडून बसले. गिलबर्ट अवाक झाला. अण्णा कुठे गायब झाले हे त्याला कळले नाही. दु:खी मनाने तो हात हलवत सातारला परत फिरला. 

१२) देशातंर्गत फौजी संघटना -  अण्णांच्या वाळव्याच्या ग्रुपला धुळ्याच्या खजिन्यातील १ लाख ६० हजार रुपयांची रक्कम दिली होती. त्यातून भरपूर हत्यारे गोव्यातून आणली गेली. त्यामुळे अण्णांना आपली स्वत:ची फौज असावी असे वाटू लागले आणि फौजी शिक्षण देणाऱ्या तज्ञ माणसांची गरज वाटू लागली. तसे तज्ञ शोधण्यासाठी आणि सशस्त्र क्रांतीच्या परवानगीसाठी अण्णा दिल्ली येथील काँग्रेसच्या कार्यालयात वल्लभभाई पटेल यांची कन्या मणीबेन पटेल यांना भेटले आणि प्रशिक्षण देण्यासाठी तज्ञांची मागणी केली. मणीबेन पटेल यांनी आम्ही अंहिसावादी असल्याने तुम्हास आम्ही परवानगी देणार नाही असे त्यांना सांगितले. त्याच वेळेला आझाद हिंद सेनेतील दोन फौजी लष्करी गणवेशात तेथे आले ते शीख होते. त्यांनीही याच पध्दतीची मागणी केली. त्यांनाही मणीबेन पटेल यांनी नकार दिला. त्या दोन्हीही शीख तरुणांना अण्णा भेटले आणि आपल्याकडे फौजी प्रशिक्षणासाठी येण्याची विनंती केली. अण्णांच्यावर विश्वास ठेवून नानकसिंग व मन्सासिंग हे दोघे वाळव्याला आले आणि नंतर ते ढगेवाडी आणि थावड्याच्या जंगलात क्रांतिकारकांना फौजी शिक्षण देऊ लागले. 

१३) रयत शिक्षण संस्थेला देणगी -  १२ मे १९४५ रोजी अण्णांनी कराड जवळच्या कापील गांवी कर्मवीर भाऊराव पाटील यांचा विद्यार्थी संघटनेमार्फत सत्कार घडवून आणला. या प्रसंगी रयत शिक्षण संस्थेला १ लाख रुपये निधी देण्याचा संकल्प जाहीर केला. या सभेला साने गुरुजी हे अध्यक्ष होते आणि पुढे २७ नोव्हेंबर १९४८ रोजी गाडगे महाराजांच्या हस्ते ही रक्कम कर्मवीरांच्याकडे सोपविण्यात आली. 

१४) हुतात्मा किसन अहिर आणि नानकसिंग यांचे देशासाठी बलिदान (२५ फेब्रुवारी १९४५) -  ढगेवाडीच्या फौजी कॅम्पचा सुगावा इंग्रजांना लागल्यामुळे फौजी कॅम्प मणदूर जवळ शाहूवाडी तालुक्यामधील थावडयाला हलविले. तिथे कॅम्प सुरु असताना याचा सुगावा इंग्रज अधिकाऱ्यांना लागला आणि त्यांनी सशस्त्र पोलीसांना घेऊन कॅम्पवर हल्ला चढविला आणि प्रचंड मोठी चकमक झाली. या लढाईत अण्णांचे दोन खंदे सहकारी हुतात्मा झाले. अण्णांना खूप वाईट वाटले. आयुष्यभर अण्ण त्यांच्या निस्सिम त्यागाचे प्रतिक म्हणून २५ फेब्रुवारी हा दिवस हुतात्मा दिन म्हणून पाळू लागले.

 

१५) देशाला स्वातंत्र्य मिळाले -  अनेक स्वातंत्र्य सैनिकांच्या बलिदानातून आणि त्यागातून देशाला स्वातंत्र्य मिळाले. पण नागनाथ अण्णा अस्वस्थ होते. मिळालेले स्वातंत्र्य तडजोडीतून मिळाले आहे असे त्यांना वाटत असे. आपल्या मनातील स्वप्न साकारण्यासाठी अण्णा पुन्हा सक्रीय झाले आणि स्वातंत्र्याचे सुराज्य करणेची शपथ त्यांनी घेतली.  

६) किसान शिक्षण संस्थेची स्थापना -  शिक्षण हे परिवर्तनाचे साधन असल्याचे अण्णांना मनोमन पटले होते. म्हणून २७ फेब्रुवारी १९४८ रोजी किसान शिक्षण संस्थेची स्थापना केली आणि या संस्थेच्यावतीने हुतात्मा किसन अहिर यांचे जीवंत स्मारक म्हणून हुतात्मा किसन अहिर विद्यालयाची स्थापना केली आणि त्याचवेळेला हुतात्मा नानकसिंग वस्तीगृह सुरु केले आणि त्या माध्यमातून गोरगरिबांच्या शिक्षणाची सोय केली. आज किसान शिक्षण संस्थेमध्ये ५ हायस्कूल, २ उच्च माध्यमिक शाळा, कृषी विभाग, तंत्रनिकेतन आणि १ महाविद्यालय आहे. 

१७) स्वकीय सरकार बरोबर दोन हात -  सातारा जिल्ह्यामध्ये शांततेचे व सुरक्षिततेचे वातावरण निर्माण व्हावे म्हणून स्वातंत्र्य सैनिकांची बैठक मुंबई इलाक्यामध्ये गृहमंत्री मोरारजी देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत गृहमंत्र्यांचे पार्लमेटरी सेक्रेटरी यशवंतराव चव्हाण यांच्या पुढकाराने मुंबई येथील सहयाद्री बंगल्यावर बोलविले होते. तिथे मोरारजीभाई देसाई आणि अण्णांच्यामध्ये शाब्दीक मतभेद झाले आणि अण्णा थेट बैठकीतून उठून बाहेर निघून आले. अण्णांचा हा अवतार बघून सगळे सहकारी बैठकीतून बाहेर पडले. बाहेर आल्या नंतर वसंतदादा पाटील यांनी अण्णांचे कौतुक केले आणि सातारचे पाणी दाखविलेबद्दल अभिनंदन केले. मोरारजी सरकारने विनाकारण पुढे नागनाथअण्णांवर पकड वॉरंट काढून अन्याय केला आणि अण्णांना १९४९ मध्ये अटक केली. स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या एका स्वातंत्र्य सैनिकाला अटक करुन मोरारजी सरकारने एक वेगळाच इतिहास घडविला. पुढे राजकीय दबावातून त्यांची विनाअट सुटका केली. 

१८) गांधी पध्दतीने विवाह -  अण्णांचे विचार आणि कृती यांच्यात एक वाक्यता होती. म्हणून १३ फेब्रुवारी १९५० मध्ये कोल्हापूर या ठिकाणी कुसूमताईच्या बरोबर अय्यर सरांचे घरी गांधी पध्दतीने पाठयपुस्तकातील कविता म्हणून जुन्या कपड्यांवर विवाह संपन्न झाला. 

१९) देश सेवेसाठी घरापासून दूर -  अण्णांनी स्वातंत्र्याचे सुराज्य करणेसाठी संसाराचा त्याग करुन आपल्या आयुष्यातील सुमारे ४० वर्षे आपला मुक्काम हुतात्मा किसन अहिर विद्यालयात ठेवला. हुतात्मा विद्यालय हे त्यांनी चळवळीचे प्रमुख केंद्र बनविले. 

२०) संयुक्त महाराष्ट्रचळवळीत सहभाग -  १९५५ ला संयुक्त महाराष्ट्राची चळवळ सुरु झाली, ती १९६० अखेर चालू होती. महाराष्ट्रामध्ये या चळवळीमध्ये अनेक लोकांनी योगदान दिले. या योगदानात अण्णांचा मोलाचा वाटा आहे. त्यातूनच मुंबई महाराष्ट्राला मिळाली. पश्चिम महाराष्ट्रातून १९५७ च्या निवडणूकीत अण्णा आमदार म्हणून निवडूण आले. १९५४ च्या गोवा मुक्‍ती आंदोलनामध्येही अण्णा सहभागी झाले होते. त्यावेळचे त्यांचे योगदान उल्लेखनीय आहे. 

२१) विविध विकास कामांना सुरुवात - शेतकरी हा अण्णांचा प्राण होता, त्याचा सर्वागिण विकास होण्यासाठी शेतकऱ्यांना अण्णांनी संघटित केले आणि १९७२ मध्ये किसान लिफ्ट इरिगेशनी स्थापना केली. त्या अगोदर वाळवा इस्लामपूर रस्त्याच्या कामासाठी साराबंदीची चळवळ ४ वर्षे अण्णांनी सुरु ठेवली. याच काळात कृष्णा नदीवर नागठाणे येथे बंधारा बांधण्यासाठी चळवळ केली. यामुळे कायमचा दुष्काळ हटला. 

२२) हुतात्मा किसन अहिर साखर कारखान्याची निर्मिती -  शेतकऱ्यांना हमीभाव मिळवून देण्यासाठी आणि त्यांची लुट थांबविण्यासाठी शेतकऱ्यांच्या मालकीचा साखर कारखाना असावा असे अण्णांना वाटू लागले आणि ते स्वप्न साकारणेसाठी किसन अहिर विद्यालयातील शिक्षकांना घेऊन अण्णांनी १९७२ मध्ये साखर कारखान्याच्या कामाला सुरुवात केली आणि मंजूरी मिळाल्यानंतर केवळ ११ महिन्यांमध्ये साखर कारखान्याची उभारणी करुन एक नवा इतिहास निर्माण केला. यासाठी १९७२ ते १९८१ या काळात सलग ८ वर्षे परवानगी करीता अण्णांनी संघर्ष केला. ज्या दिवशी कारखान्यात साखर पडली त्याच दिवशी अण्णा कारखान्याच्या गेटमधून बाहेर पडले आणि ते कधीच परत कारखान्यात गेले नाहीत. अण्णा कारखान्याचे सभासदही नव्हते. 

२३) हुतात्मा पॅटर्न -  हुतात्मा कारखान्याच्या निर्मितीनंतर अण्णांनी शेतकरी, कष्टकरी, शेतमजूर यांच्यासाठी काही धोरणात्मक निर्णय घेऊन हुतात्मा पॅटर्न निर्माण केला. रात्रीची ऊस तोड, उत्तम रिकव्हरी आणि शेतकऱ्यांच्या ऊसाला देशात सर्वात जास्त ऊसदर देऊन शेतकऱ्यांचा सन्मान केला. ऊस तोड कामगारांसाठी अण्णांनी पक्की ४०० घरे बांधून दिली. आयोगाप्रमाणे कामगारांना वेतन दिले आणि ४०% बोनस देऊन कामगारांचा सन्मान केला. कर्जाची मुदत ५ वर्षे असतानाही केवळ ३ वर्षात कारखाना कर्जमुक्त केला आणि अत्यंत पारदर्शकपणे कारखान्याचा कारभार चालवून अनेक पुरस्कार कारखान्याला मिळवून दिले. आज संपूर्ण भारतात सहकाराच्या क्षेत्रात हुतात्मा पॅटर्नचा गवगवा आहे. 

२४) धरणग्रस्तांची चळवळ -  धरणग्रस्तांच्या त्यागातून कोयना आणि वारणा धरणे निर्माण झाली आणि विकासाची गंगा सुरु झाली, पण धरणग्रस्त देशोधडीला लागले. त्यांची झाडाझडती थांबवणेसाठी १९८६ मध्ये वारणा धरणग्रस्त संघर्ष संघटनेची स्थापना केली आणि १९८८ मध्ये कोयना धरणग्रस्त संघटनेची स्थापना केली आणि याच माध्यमातून त्यांच्या व्यथा सरकारी दरबारी मांडून त्यांना न्याय मिळवून दिला. 

२५) पुन्हा एकदा आमदार झाले -  हुतात्मा पॅटर्नचा सकारात्मक परिणाम परिसरातील जनतेवर झाला आणि अण्णा विधान सभेवर गेले पाहिजेत असे लोकांना वाटू लागले आणि त्यातूनच १९८५ मध्ये अपक्ष म्हणून अण्णा भरघोस मतांनी आमदार म्हणून निवडून आले. 

२६) सांस्कृतिक आणि सामाजिक चळवळ -  सामाजिक सुधारणेला सांस्कृतिक चळवळीचे पाठबळ असले पाहिजे यासाठी अण्णांनी वाळवा येथे १९८८ आणि १९९६ मध्ये अखिल भारतीय दलित आदिवासी ग्रामीण संयुक्त साहित्य संम्मेलन घेऊन पुरोगामी प्रागतिक विचारमथंन घडवून आणले. त्याचबरोबर २५ फेब्रुवारी १९९३ ला ऐक्याचे प्रतिक म्हणून वाळवा ते हुंतात्मानगर ८० कि.मी. ची मानवी साखळी केली. २६ मे १९९३ ला किणी, जिल्हा कोल्हापूर येथे १ लाख स्त्री-पुरुषांची शेतमजूर, कष्टकरी शेतकरी संघटनेच्यावतीने शेतकरी परिषद घेतली आणि न्याय मागण्या मांडल्या. किल्लारी (लातूर) येथे झालेल्या भूकंपग्रस्तांना ताबडतोब औषधे आणि खाद्यपदार्थ पाठवून अण्णांनी आपले दातृत्व दाखविले. भूकंपग्रस्त १०८ मुलांना शिक्षणासाठी दत्तक घेतले. ५ नोव्हेंबर १९९६ ला महाराष्ट्र धरणग्रस्त व प्रकल्पग्रस्त शेतकरी संघटनेच्यावतीने मोर्चा काढला. 

२७) पाणी संघर्ष चळवळ -  एकीकडे धरणग्रस्तांसाठी लढणाऱ्या अण्णांनी पश्चिम महाराष्ट्रातील १३ दुष्काळग्रस्त तालुक्यातील लोकांना पाणी मिळण्यासाठी पाणी संघर्ष चळवळ उभी केली आणि ११ जुलै १९९३ रोजी आटपाडी येथे भव्य पाणी परिषद घेतली आणि अखेरच्या श्वासापर्यंत ती अखंडित चळवळ सुरु ठेवली. त्यामुळेच आज दुष्काळग्रस्त लोकांसाठी कृष्णा खोरे महामंडळ शासनाला स्थापन करावे लागले हे अण्णांच्या चळवळीचे यश आहे. 

२८) आयकर लढयाला यश -  केंद्र शासनाच्यावतीने कारखान्यावर अन्यायकारी आयकर लादला जात होता. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत होते. हे अण्णांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी १३ मे २००१ पासून सहकारी साखर कारखान्यावर लादलेल्या आयकर विरोधी लढा संघटित केला आणि या लढ्याला त्यांच्या पश्‍चात यश मिळाले. त्यामुळे सगळे कारखानदार अण्णाबद्दल कृतज्ञता व्यक्त करतात. 

२९) अनेक पुरस्कारांनी सन्मानित - अण्णांच्या स्वातंत्र्यपुर्व आणि स्वातंत्र्योत्तर लढयातील योगदानासाठी अनेक पुरस्कार मिळाले. त्यामध्ये ८ डिसेंबर २००८ रोजी शिवाजी विद्यापीठाने 'डी.लिट” ही सन्माननिय पदवी देऊन विभूषित केले. तर भारत सरकारने राष्ट्रपती मा.प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते “पद्मभूषण” सन्मान देऊन त्यांच्या जीवन कार्याचा गौरव केला. या थोर क्रांतिकारक भूमिपुत्राचे २२ मार्च २०१२ रोजी महानिर्वाण झाले.

 

संदर्भ :- क्रांतिवीर नागनाथअण्णा (चस्त्रिग्रंथ भाग १ व २) लेखक जयवंत अहिर. 

पद्मभूषण क्रांतिवीर डॉ नागनाथ अण्णा नायकवडी यांच्या कुटुंबातील तिसऱ्या पिढीचे नेतृत्व मा.गौरवभाऊ नायकवडी

bottom of page